Friday, November 26, 2010

नमन मुंबईच्या हुतात्म्यांना...

काहीवर्षांपूर्वी  आपल्यासाठी २६ नोव्हेंबर हा दरवर्षी येणारा तसा एक सर्वसाधारण दिवस होता, पण २ वर्षांपूर्वी याचं दिवशी जे काही घडलं  त्यामुळे आता हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात एक काळा दिवस म्हणूनच उजाडतो. 
भारताला तसं बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ले नवीन नाहीत पण हा हल्ला खूप वेगळा होता. दहा तुटपुंज्या अतिरेक्यांनी आपल्या घरात घुसून ३ दिवसांपर्यंत धुमाकूळ घातला होता. ६०-७० तास  चाललेल्या या युद्धात शेकडो निरपराधांनी आपले प्राण गमावले तर अनेक कर्तबगार पोलीस अधिकारी आणि जवान शहीद झाले.
भरात भर म्हणून मिडियावाले या गोष्टी सबंध जगाला लाइव दाखवत होते, ती सगळी दृश्य बघून त्या तीन दिवसात माझं मन अनेकदा पिळवटून निघालं. कधी त्याला खूप रडू आलं तर कधी रागाने ते पेटून उठलं पण मी पडलो एक सामान्य माणूस, मी करून करून काय करणार? मग मी तेच करायचं ठरवलं जे आपल्याला जमतं. एक पेन आणि कागद घेतला आणि मनात आलं ते त्यावर उतरवत गेलो. काही वेळानं पाहिलं तर एक कविता झाली होती पण मी याला कविता म्हणणार नाही ही एक श्रद्धांजली आहे माझ्यातर्फे त्या सर्व ज्ञात अज्ञात लोकांना ज्यांना या हल्ल्याची झळ पोहोचली आहे.....
 
सागराच्या कवेमध्ये सुंदरसे एक शहर वसे,
येई त्यास सामावून घेई, सर्वदूर ही ख्याती असे.
मायानगरी म्हणती याला, लक्ष्मीचे वरदान जसे;
वेगवान हे जीवन इथले, आरामाला स्थान नसे.
 
ऐश्वर्याला परि त्याच्या एक भयानक शाप असे,
दहशतवादाचा भुजंग त्यासी विळखा मारून बसे.
रक्ताचे पडतात सडे अन मुडद्यांचे उठतात ठसे;
भय हे इथले संपत नाही, मृत्यूचे थैमान दिसे.

एकेदिवशी विनाश करण्या, शहरामध्ये सैतान घुसे,
रक्षण करण्या जनतेचे, सैन्य आमुचे सज्ज असे.
शूरवीर ते लढले ऐसे, शिवबाचे मावळे जसे,
उपकारांचे अपार त्यांच्या, कर्ज तरी फिटणार कसे?

पुन्हा पुन्हा हे घडते येथे, यात कुणाचा दोष असे?
नेत्यांच्या भूलथापांना, जनता आता मुळी ना फसे.
शेकडोंनी प्राण गमाविले, नुकसान हे भरणार कसे?
मृतात्म्यांना शांती मिळो, हेच ईश्वर चरणी नमन असे!

-२७/११/२००८