"जिद्दी से जिद्दी दाग आसनी से निकालता है Surf Excel" अशी जाहिरात TV वर पाहिली आणि तडक दुकानात जाऊन मी एक Surf Excel चे packet घेऊन आलो....
अहो का काय विचारताय? त्याला कारण ही तितकंच serious होतं! माझ्या नव्या कोऱ्या शर्टवर चिखलाचे अन मातीचे असे विविधरंगी डाग लागलेले होते, आता शर्टाची किंमत इथे विचारू नका बुवा, कारण म्हणतात ना "हौसेला मोल नसतं ".
तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि नवा कोरा शर्ट घालून मी हे इतके डाग लाऊन घ्यायला गेलो कुठे होतो? त्याच झालं असं कि काल मला आमच्या एका मित्राकडे जेवायला जायचं होतं, लग्नाचा वाढदिवस होता त्याच्या! तसा मी कुणा मित्राच आमंत्रण सहसा नाकारत नाही पण कुणाच्या marriage annivarsary ला जायचं म्हंटलं ना कि मला जरा awkward च वाटतं. ह्या marriage annivarsaries म्हणजे एखाद्याच्या पुण्यतिथीला, जयंती म्हणण्यासारखा प्रकार झाला. खरंतर जगातला कुठलाही नवरा हे annivarsiry वगैरे करण्याच्या favour मध्ये नसतो पण करणार काय? स्त्री हट्टापुढे त्याला नमतं घ्यावंच लागतं! असो विषयांतर नको.
घड्याळात दुपारचे ४ वाजत आले होते, संध्याकाळी ५ वाजता मित्राच्या घरी पोचायचं होतं. मी आपला सर्व काही आवरून आणि हो, नुकताच घेतलेला नवा कोरा शर्ट घालून तयार झालो होतो. एकावर एक फ्री मिळालेल्या बॉडी स्प्रे चे काही शिंतोडे अंगावर शिंपडून मी निघण्यासाठी सज्ज झालो. आमच्या ओल्ड वाईन प्रमाणे भासणाऱ्या फटफटीला टांग मारून मी मित्राच्या घराच्या दिशेने निघालो. आता फटफटीला ओल्ड वाईनची उपमा देण्याचा हेतू एवढाच कि या जगाच्या पाठीवर वाईन ही अशी एकच चीज आहे, जी जितकी जुनी तितकी जास्त चांगली लागते, पण याचा अर्थ असा नव्हे हं की आमची फटफटी काही खूप जुनी-पुराणी आहे. हं आता आमचे काही पुणेरी मित्र तिला १८५७ च मॉडेल म्हणतात इतकचं...
तर अशाप्रकारे मी आमच्या फटफटीवरून मित्राच्या घराकडे मार्गस्थ झालो. माणसानं नवीन कपडे घातले की कसा त्याच्या वागण्यात एक प्रकारचा confidence येतो तसा confidence आज माझ्या driving मध्ये दिसत होता. तसंही पुण्याच्या रस्त्यावर गाडी चालवायची म्हणजे तुम्हाला बराच self confidence असावा लागतो, असो. बघता बघता मी मित्राच्या घराजवळ येऊन पोचलो. आता भांडारकर रोड वर तो नक्की कुठल्या गल्लीत राहतो हे काही मला आठवत नव्हते. पूर्वी त्यांच्या गल्लीच्या टोकावर एक आंब्याच झाड असायचं ती खुणगाठ लक्षात ठेऊन आम्ही मित्र त्याच्याकडे जायचो पण आता रस्तारुंदीकरणात ते झाड ही गेले, असो. तर पुढे मागे करत करत मी एका गल्लीत शिरलो. इथे मात्र आता सगळी घरं सारखीच दिसत होती आणि रस्तावर एक चिटपाखरू देखील नव्हत. आता काय करावे असे म्हणताना समोर एका बंगल्याचा वॉचमन विडी फुंकत बसलेला दिसला. यालाच विचारावं म्हणत मी त्याच्यापाशी गेलो आणि म्हणालो "अहो हा बंगला नं. ४९ कुणीकडे आहे?". एक ना दोन त्याच्या चेहऱ्यावरची माशी देखील हलली नाही. मी म्हणालो "अरे बहिरा आहेस का?". माझ्याकडे थंडपणे बघत त्याने हातातली विडी जमिनीवर विझवली आणि उजव्या कानाच्या मागे खोचत म्हणाला.. "साहब आप का बोल रहे है, उ हमे कछु समज नही आ रहा है". मी कपाळावर हात मारून घेतला.. "अरे देवा अजून एक!" खरं तर मला "मनसे" त्याचा खूप राग आला होता, पण माझ्यासमोरील बिकट परिस्थिती पाहता मी तो आवरता घेतला.
मनातल्या मनात राजसाहेबांची माफी मागत मी त्याला विचारलं "भैय्या वो एक address विचारनेका था!" आता एकोण पन्नास ला हिंदीत काय म्हणतात हे मात्र मला काही केल्या आठवेना, मग भीत भीत मी म्हणालो "वो बंगला नं. एकोण पचास किधर है" त्याला कितपत कळालं माहित नाही पण तो हसत हसत म्हणाला " सर आप गलत गली में आ गये है, बंगला नं. उनचास तो अगली गली में है"." त्यादिवशी मला समजलं की हिंदीत एकोण पन्नासला 'उनचास' म्हणतात, असो.
तर त्या वॉचमन ला धन्यवाद देत मी यु टर्न घेतला. थोडा पुढे गेलो तर काय पाहतो? अचानक समोरून एक मोठ्ठी होंडा सिटी कार एकदम माझ्या अंगावर आली होती. आता धडक चुकवणे कठीण होते, प्रसंग मोठा बाका होता. मी मनातल्या मनात पटकन सगळी calculations केली, समोर डावीकडे एक मोठा खड्डा होता आणि उजवीकडे भला मोठा दगड! डावीकडे गेल्यास तुलनेने कमी दुखापत होईल असा practical decision घेत मी गाडी डावीकडे वळवली आणि यथावकाश त्या खड्डयात जाऊन land झालो. त्यादिवशी मला कळालं की आमची आई का सारखं म्हणायची, माझ्याकडे दूरदृष्टीच नाहीये मुळी! कारण दुरून मला तो खड्डा तर दिसला पण त्यात भरून राहीलेला चिखल मात्र अजिबात दिसला नाही.असो! मला दुखापत अशी विशेष काही झाली नाही पण माझ्या नव्या कोऱ्या शर्टावर जी काही रंगपंचमी झाली होती ती पाहिल्यावर माझी "हसू का रडू" अशी अवस्था झाली..
ती दुष्ट होंडा सिटी जरा पुढे जाऊन थांबली, आत्ता पर्यंत माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती. कधी एकदा त्या गाडीतून तो driver बाहेर पडतोय आणि मी त्याच्यावर शिव्याची लाखोली वाहतोय असे मला झाले होते .कारचा पुढचा दरवाजा उघडला आणि आतून एक उंच टाचेचं sandal बाहेर आलं, बघता बघता गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमधे लपेट्लेला एक कमनीय बांधा जमिनीवर उतरला,लांब सडक केस,उजळ कांती, फिकट गुलाबी ओठ आणि डोळ्यांवर एक मोठ्ठा गॉगल... हिंदी चित्रपटातल्या हिरोईन प्रमाणे तिनं माझ्याकडं मान फिरवली आणि मी पाहतच राहिलो..... आयला मागच्या कित्येक वर्षात असला कडक आयटम बघण्यात आला नव्हता, ती जसजशी माझ्याजवळ येऊ लागली तसतसा मला background ला "अप्सरा आली" गाण्याचे स्वर घुमत असल्याचा भास होऊ लागला. ती माझ्याजवळ आली, किती केविलवाणा चेहरा झाला होता तिचा! "Sorry Sorry" म्हणत, ती गयावया करू लागली. अपराधीपणाचे भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते, तसा मी ही तिला माफ करायला उतावीळ झालो होतोच. आता एवढ्या सुंदर मुलीला शिव्या कोण देणार? नाही का? तुम्हीच सांगा, त्यामुळे मी तोंडात आलेल्या सगळ्या शिव्या एक मोठ्ठा आवंढा गिळावा तशा गिळून टाकल्या. ओशाळल्यासारखं करत मी म्हणालो "Its Ok चलता है." सोबतीला "बड़े बड़े देशोमें ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है" हा DDLJ चा dialouge ही चिकटवला.आणि काय सांगू तुम्हाला ? ती जे गालातल्या गालात हसलीये, आहा! ते पाहून मला स्वर्ग फक्त चार बोटे दूर उरला होता. मला उठवण्यासाठी तिनं मग एक हात पुढे केला, मी ही इतकी नामी संधी दवडनाऱ्यातला नव्हतो. क्षणाचाही विलम्ब न लावता मी माझे दोन्ही हात पुढे केले. "उम्मीद से दुगना" स्कीम चा फायदा घेत अशा तर्हेने मी उभा राहिलो. पुढे तिने "sorry , मी चुकले, चूक माझीच होती" या वाक्यांची अनेक आवर्तनं केली. "केवळ तुमच्या प्रसंगावधानामुळे माझ्या गाडीला काही झालं नाही, नाहीतर पपा मला खूप ओरडले असते आणि मला पुन्हा कधी कधी गाडी दिली नसती Thanks" ती बोलत होती अन मी ऐकत होतो. किती गोड होता तिचा आवाज! सरतेशेवटी मी तिला मोठ्या मनानं माफ केलं. जाता जाता तिनं मला तिचं कार्ड दिलं आणि म्हणाली "Call me if you need any help !!"
आली तशी गाडीत बसून ती निघून गेली, जणू आकाशातून कोणी परी धरतीवर आली, क्षणभर विसावली आणि परत भुर्रकन उडून गेली. मग मी ही आपली "ओल्ड वाईन" उचलली आणि चालू लागलो. आता या अशा अवतारात मित्राकडे जाण्यात काही अर्थ उरला नव्हता म्हणून मग मी गाडी परत आपल्या घराकडे वळवली................
तर अशा प्रकारे आमचा नवा कोरा शर्ट मळला होता, आता मी त्याला Surf Excel च्या पाण्यात भिजवून ठेवलाय. डाग कितपत निघतील माहित नाही, कदाचित ते निघुही नयेत अशीच माझी इच्छा आहे कारण या डागांमध्ये माझ्या आठवणी अडकल्यात त्या "परी"च्या आठवणी.....
अचानक "देवदास" चित्रपटातील तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला ज्यात देवदास पारोच्या कपाळावर एक वेताची काठी मारून जखम करतो, तेव्हा पारो त्याला म्हणते.. "तुम्हारी याद समझकर मैं इस दाग को हमेशा सहेजकर रखुंगी..." आज तशाच काहीशा माझ्या भावना झाल्यात...त्या परीने दिलेले हे "डाग" मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे आणि हा शर्ट पुन्हा कधी कधी धुणार नाही.....
आज मला कळलं या Surf Excel वाल्यांच्या स्लोगनमागचं रहस्य आणि मी देखील जोरात ओरडलो, "दाग अच्छे है"......................