Saturday, August 20, 2011

मित्र...

तो येतो दबक्या पावलांनी जाणवत नाही कुणालाच,
भासते ती फक्त तो इथेच कुठेतरी असल्याची चाहूल!!
त्याचा वावर कसा साऱ्या वातावरणाला जड जड करून टाकतो.
त्या जडपणाला कंटाळून मग मन शब्दांची ओझी वाहायला नकार देत.
सगळीकडे भरून राहते एक अधीर शांतता......
आपल्यालाच ऐकू येऊ लागते आपल्या हृदयाची धडधड आणि जाणवत राहतो छातीतून फिरणारा तो वारा.
कान सुन्न होतात. हजारोंच्या गर्दीमध्ये सुद्धा आपण एकटे आहोत असं वाटू लागत.
डोळे भरतात काठोकाठ पण प्रवाही होत नाहीत.
त्याचं अस्तित्व कुणीच नाकारत नाही पण त्याला मात्र सदैव टाळत असतो आपण! का??
तो येतो एखाद्या खूप जुन्या मित्राप्रमाणे. आपल्याला कडकडून मिठी मारायची असते त्याला!
का टाळत असतो त्याला आपण?
मी मात्र मुळीच असं करत नाही. हात मोकळे करून मी त्याला मिठीत बोलावतो. तोही येतो तितक्याच प्रेमाने!
त्याला छातीशी कवटाळून मी म्हणतो. “आपण पूर्वी कधीच भेटलो नाही, मग तरीही तू मला इतका जवळचा कसा वाटतोस?”
तो म्हणतो. “अरे आपण तर जीवाभावाचे मित्र. तू मला विसरलास पण मी कसा विसरेन तुला? चल माझ्याबरोबर माझ्या गावाला!”
मी पुन्हा काहीतरी कारण काढून टाळायचा प्रयत्न करतो. तो सुद्धा “नाही आत्ताच चल” असा हट्ट धरून बसतो.
मी म्हणतो “अरे लाईट बिल भरायचं राहिलंय, उद्यासाठी भाजी आणायचीये. खूप कामं पडलीयेत रे!”
पण तो काही ऐकत नाही.शेवटी हो नाही म्हणता म्हणता मी तयार होतो पण “परत कधी सोडणार?” असं थेट विचारतो.
तो हसून म्हणतो. “अरे आधी चल तर, चांगले चार दिवस रहा. मग बघू! त्याचं इतकं प्रेम बघून आनंदाने डोळे मिटतात माझे!
डोळ्यांच्या कोपऱ्यात किती वेळ वाट पाहत असलेला तो एक थेंब पटकन गालावरून खाली ओघळतो..
मारलेली मिठी अजून घट्ट करत मी त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणतो. “अरे स्वतःला माझा मित्र म्हणवतोस आणि तुझं नाव देखील नाही सांगितलस अजून?”
मला जवळ घेत तो माझ्या कानात काहीतरी कुजबुजतो.
आठवत असलेले ते शेवटचे २ शब्द....“मी मृत्यू”

1 comment: