Saturday, April 24, 2010

कधीतरी...

कधीतरी उगाचच खूप एकटं वाटतं,
कधीतरी उगाचच डोळ्यात पाणी दाटतं.
मी लाख रोखू पाहतो त्या जलधारा,
पण तू समोर येताच सारं आभाळ फाटतं!

तुझ्यासवे चेतवते, पुन्हा ती सोनेरी आठवण.
तुझ्या सहवासातील ते धुंद गुलाबी क्षण.
आठवणींच्या वाटा तुडवत, मी येऊन थबकतो तिथे,
एकटा सोडून मला गेली होतीस जिथे!

मनात प्रश्नाचं काहूर माजतं,
जे पुन्हा पुन्हा मला हेच विचारतं.
कुणाचं प्रेम अचानक इतकं कसं काय आटतं?

कधीतरी उगाचच खूप एकटं वाटतं,
कधीतरी उगाचच डोळ्यात पाणी दाटतं......

अश्रुवर्षा...

किती पाहिले मी ऋतू पावसाचे,
सखे सोबती चिंब ओले जयात!
परि मज नव्हती, आसक्ती त्या जळाची,
राहिलो कोरडा मी, त्या ओल्या वयात!

पाहून दाटलेले मेघ नभी यंदा,
वाटे आपणही भिजुनी बघावे तयात!
श्वासात भरुनी घ्यावा, तो सुगंध मातीचा,
आणिक झेलावे, ते थेंब टपोरे हातात!

पाऊल ठेवता मी, त्या खुल्या अंगणात,
नभ सारे मोकळे, झाले एका क्षणात!
मज भिजवू न शकल्या, त्या प्रेमधारा,
मग भिजलो पुन्हा मी, अश्रूंच्या पावसात!

Friday, April 9, 2010

पुन्हा.....

गुढीपाडव्याच्या मंगल दिवसासोबत चैत्र मास प्रारंभ झाला आहे, अर्थातच वसंत ऋतूचेही आगमन झालेले आहे. निसर्गाने पुन्हा एकदा कात टाकलीये. काही दिवसांपूर्वीपर्यंत रुक्ष वाटणारी धरती आणि झाडे लवकरच पुन्हा एकदा हिरव्यागार रंगात न्हाऊन निघणार आहे. अशातच मला सुचलेल्या या काही ओळी खाली देत आहे.

शिशिरातली पानगळ ओसरली,
धरती नव्याने फुलारली.
पहा वसंताची चाहूल येता,
पुन्हा पानं पानं थरारली.

कोमेजलेली ती सारी स्वप्ने,
पुन्हा आज फिरुनी तरारली.
पुन्हा छेडिले सूर वेड्या मनाने,
अन तार हृदयाची झंकारली.

अशी आज एक वादळी लाट आली,
किनाऱ्यासी स्तब्ध नौका शहारली.
पुन्हा सोडिण्या तिला त्या सागरात,
पहा शिडे आम्ही उभारली...!