Friday, April 9, 2010

पुन्हा.....

गुढीपाडव्याच्या मंगल दिवसासोबत चैत्र मास प्रारंभ झाला आहे, अर्थातच वसंत ऋतूचेही आगमन झालेले आहे. निसर्गाने पुन्हा एकदा कात टाकलीये. काही दिवसांपूर्वीपर्यंत रुक्ष वाटणारी धरती आणि झाडे लवकरच पुन्हा एकदा हिरव्यागार रंगात न्हाऊन निघणार आहे. अशातच मला सुचलेल्या या काही ओळी खाली देत आहे.

शिशिरातली पानगळ ओसरली,
धरती नव्याने फुलारली.
पहा वसंताची चाहूल येता,
पुन्हा पानं पानं थरारली.

कोमेजलेली ती सारी स्वप्ने,
पुन्हा आज फिरुनी तरारली.
पुन्हा छेडिले सूर वेड्या मनाने,
अन तार हृदयाची झंकारली.

अशी आज एक वादळी लाट आली,
किनाऱ्यासी स्तब्ध नौका शहारली.
पुन्हा सोडिण्या तिला त्या सागरात,
पहा शिडे आम्ही उभारली...!

1 comment: