Wednesday, March 3, 2010

आरती क्रिकेटपटुंची...

सध्या अवघे क्रिकेटविश्व हे "सचिनमय" होउन  गेले आहे. अर्थात त्याने तसा "भीमपराक्रम" केलेला आहेच. एकदिवसीय सामन्यांच्या ४० वर्षाच्या इतिहासात पहिला द्विशतकवीर होण्याचा बहुमान त्याने पटकावलाय.अशातच काल सचिनवरील एक e-mail वाचण्यात आला, ज्यात "सुखकर्ता-दुखहर्ता" ह्या गणपतीच्या आरतीवर बेतलेली सचिनची आरती लिहली होती. आमच्या सगळ्या मित्रमंडळाला ती इतकी आवडली कि येत्या २४ एप्रिलला म्हणजेच  सचिनच्या वाढदिवशी आम्ही सगळ्यांनी सचिनच्या पोस्टर समोर ती आरती गायचा निर्णय ही घेतला.
पण त्याच झालं असं की आमच्या ग्रुप मध्ये एक "राहुल द्रविड फॅन क्लब" देखील आहे, त्याचं अस म्हणण  पडल की सचिन बरोबर आमच्या "Wall" ची ही आरती करूयात ना!  आता प्रश्न हा होता की द्रविड ची आरती आणायची कुठून? मग आम्ही विचार केला कि  आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि आम्ही कागद-पेन घेऊन लिहायला बसलो. आता सचिन हा क्रिकेट चे आराध्य आहे म्हणून त्याची आरती ही आदिपुज्य गणरायाच्या आरतीवर बेतली होती.
कर्नाटकचे (आणि संपूर्ण भारताचे ही) शिरोमणी राहुल द्रविड यांच्या आरतीसाठी मग "कानड्या" विठ्ठलाच्या म्हणजेच पांडुरंगाच्या आरतीची निवड केली....


युगे अठ्ठावीस पिचवरी उभा |
द्रविडांच्या राहुलची, दिसे दिव्य शोभा ||
batting याची जेव्हा येतसे रंगा | 
रटाळ खेळ करुनी, हा उद्धरी संघा ||१||

जयदेव  जयदेव जय  राहुलराया | 
दिवस घालवुनी, match वाचवुनी, पावे भारता ||धृ||

batting ची ह्याच्या काय वर्णावी महती |
wall  नामे म्हणुनी, प्रसिद्ध जगती ||  
तळ ठोकुनिया हा जेव्हा उभा ठाकती |
bowler लोकांची मग होये दुर्गती. ||२||

cover drive याचा शॉट आगळा |
तंत्रशुद्ध batting चा अद्भुत सोहळा ||
पाहुनी याच्या या मंदगती खेळा |
अनेकांना झोप अनावर, होतसे डोळा ||३||

मितभाषी असे हा, बहु सुस्वर स्वभावे |
तरुणींना परी याचे रूपच अति भावे||
सर्वाधिक झेलांचा विक्रम याच्या नावे |
याच्या हातून सुटोनी ball कसा जावे ||४||

कोलकत्त्याचे मैदान, ईडन गार्डन |
follow-on साठी कांगारूंनी केले पाचारण || 
बिकट समयी याचे झाले आगमन |
सोबतीला होता एकटा VVS लक्ष्मण ||५||

शतक ठोकुनी याने अशी batting केली |
उद्दाम कांगारूंना धूळ चारीली  ||
त्या एका खेळीने आमची नाराजी गेली |
म्हणुनी त्यासी पूजण्या ही आरती रचिली ||६||

जयदेव  जयदेव जय  राहुलराया | 
शतक झळकावुनी, match जिंकवुनी, पाविले  भारता ||धृ||

ही आरती आमच्या "राहुल द्रविड फॅन क्लब" च्या मित्रांना ऐकवल्यावर ते प्रचंड खुश झाले आणि आता आम्ही येत्या २४ एप्रिल ला या दोन्ही आरत्या सचिन अणि राहुलच्या पोस्टर समोर गाण्याच ठरवलय. सोबतीला नैवेद्य ही असणार आहेच. सचिनच्या पोस्टर समोर Sunfeast बिस्किट आणि Boost चा तर राहुल च्या पोस्टर समोर किसान जामचा!!!!
पण या सगळ्यात एक तोटा असा झाला कि ही आरती वाचून आता आमच्या ग्रुप मधील काही सौरव गांगुली फॅनस ही माझ्या मागे लागलेत, त्यांच्या आवडत्या दादाची आरती लिहण्यासाठी, त्यासाठी बिदागी म्हणून त्यानी मला आत्ताच एक "टायगर" बिस्किटचा पुडाही देऊन ठेवलाय ....