Saturday, April 21, 2012

कल्पवृक्ष

Calendar ची भरभर बदलणारी पानं,
घड्याळाचे सरसर पळणारे काटे.
क्षणभरासाठी का होईना,
आयुष्य थांबून जावं असं वाटे.

गेले ते दिवस विसरून जाऊ थोडे,
उद्याच्या स्वप्नांचे चौखूर उधळू घोडे.
वर्तमानाचा आनंद घेऊ कणाकणाने,
कधीतरी स्वतःसाठी जगून पाहू थोडे,

विसावतां जरासे त्या कल्पवृक्षाखाली,
इच्छा हीच एक, माझ्या मनात दाटे!!

Tuesday, April 17, 2012

आठवणी..

आठवणी या फुलांसारख्या असतात नाही?.
काही मोगऱ्या प्रमाणे पांढऱ्या शुभ्र तर काही गुलमोहराप्रमाणे लालचुटूक!
काही सुर्यफुलासारख्या स्वच्छ प्रकाशात दिसतात तर काही रातराणीसारख्या रात्रीच्या काळोखात उमलतात. कधीकधी पारिजातकाप्रमाणे यांचाही सडा पडतो तर कधीकधी मनाच्या संथ तळ्यात या कमळाप्रमाणे एकट्याच डौलत राहतात.
वरवर गुलाबासारख्या मऊ दिसत असल्या तरी बऱ्याच वेळा यांच्या तळाशी काटे देखील असतात. काहीही असो पण आठवणी आणि फुलं दोन्हीही मनात कायम दरवळणारा सुगंध सोडून जातात...


Tuesday, March 27, 2012

जंगलचा कायदा..

माणसाची उत्पत्ती प्राण्यांपासून झाली या गोष्टीचा प्रत्यय माणूस आजही पुन्हा पुन्हा करून देत असतो. हजारो वर्षांचा प्रवास करत माणूस जंगलातून शहरापर्यंत येऊन पोचला खरा पण त्याच्या रक्तात आजही तो जंगलचा कायदा चांगलाच भिनून राहिलाय आणि वेळोवेळी संधी मिळताच माणूस त्याच्यातल्या या जनावराला वाट मोकळी करून देत असतो.
कळप करून राहणे हा जंगलचा मुलभूत नियम माणूस आजतागायत न चुकता पाळत आलाय. आखूड शेपटीचे, लांब शिंगाचे, उंच मानेचे, जाड पायाचे अशा एक  ना  हजार गोष्टी प्रमाण मानत माणसातली ही जनावरं आपआपला  कंपू करून राहत असतात.
आता कळप म्हणला कि त्याबरोबर त्याची स्वतःची अशी संस्कृतीही आलीच. संस्कृती कसली?आचारसंहिताच ती! अमुक एखादी गोष्ट करणे म्हणजे पुण्य, तमुक एखादी गोष्ट करणे म्हणजे पाप वगैरे वगैरेची नियमावली. आता कळपाप्रमाणे हे नियम बदलत असतात म्हणा पण एक नियम मात्र सगळीकडे सारखाच असतो, तो म्हणजे एका कळपातला प्राणी हा चुकूनही दुसऱ्या कळपात जाता कामा नये. समजा एखादं जनावर वाट चुकून वेगळ्या कळपात शिरलंच तर मग त्याला जंगलच्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या कायद्याची ओळख करून देण्यात येते तो म्हणजे शिकार!!!
दरवेळी ही शिकार पोट फाडून किंवा रक्त पिऊनच केली जाते असं नाही.  बऱ्याचदा त्या जनावराचं  अन्नपाणी तोडण्यात येत, त्याला अपमानाच्या आणि तिरस्काराच्या डागण्या दिल्या जातात. कधीकधी त्याला वाळीतही टाकण्यात येत. प्रचंड छळवणूक आणि मनस्तापाला कंटाळून मग ते जनावर स्वतःच आपले प्राण सोडतं. 
त्या भरकटलेल्या जनावराची कथा ऐकून मग इतर सर्व प्राणी निमुटपणे जंगलच्या कायद्याचं पालन करू लागतात आणि बघता बघता जंगल अधिकच घनदाट होत जातं...

Sunday, February 19, 2012

एकटा..

प्रत्येक 'त्या'च्या हातात कोण्या 'ती' चा हात आहे.
प्रत्येक 'त्या'ला कोण्या 'ती' ची साथ आहे.
मी एकटाच अजुनी या संभ्रमात आहे.
कोण आहे ती? जी माझ्या नशिबात आहे.
काही जण असतातच कमनशिबी असे ऐकिवात आहे.
मी ही त्यातलाच एक, नवल काय त्यात आहे?
पण एके दिवशी ती नक्की भेटेल, जिच्या मी शोधात आहे.
तोपर्यंत तरी एकट्यानेच चालायची ही वाट आहे..

Thursday, February 16, 2012

कुरुक्षेत्र...

अगणित झाले वार जरी, छातीवरी झेलायचे,
ऊठ पुन्हा पेटून गड्या, तुज उत्तर आहे द्यायचे.

प्रेमगीते, भावगीते तुजसाठी बनलीच नाही,
तुजसदा त्वेषाने हे समरगीतच गायचे.

जीवनाच्या कुरुक्षेत्री, भावनांना स्थान नाही,
आप्तांवरती बाण रोखून, तुज अर्जुन आहे व्हायचे.

पाप-पुण्याचा हिशोब, कर येथेच चुकता,
तुज तुझे गाऱ्हाणे ना दैवादारी न्यायचे.

शपथ तुला लखलखणाऱ्या तलवारीच्या पात्याची,
हरलास ही लढाई जरी, तुज युद्ध आहे जिंकायचे.