Thursday, February 16, 2012

कुरुक्षेत्र...

अगणित झाले वार जरी, छातीवरी झेलायचे,
ऊठ पुन्हा पेटून गड्या, तुज उत्तर आहे द्यायचे.

प्रेमगीते, भावगीते तुजसाठी बनलीच नाही,
तुजसदा त्वेषाने हे समरगीतच गायचे.

जीवनाच्या कुरुक्षेत्री, भावनांना स्थान नाही,
आप्तांवरती बाण रोखून, तुज अर्जुन आहे व्हायचे.

पाप-पुण्याचा हिशोब, कर येथेच चुकता,
तुज तुझे गाऱ्हाणे ना दैवादारी न्यायचे.

शपथ तुला लखलखणाऱ्या तलवारीच्या पात्याची,
हरलास ही लढाई जरी, तुज युद्ध आहे जिंकायचे.

Saturday, December 31, 2011

आयुष्याची वही..



आयुष्याच्या वहीचं एक नवीन पानं उलगडतांना,
आज आठवतायेत ती मागची सारी पानं!
त्यांच्यावर कोरलेल्या त्या कडू-गोड आठवणी,
कुठे कुठे केलेली ती खाडाखोड! कुठे चितारलेली ती नक्षी!
हे सारं मागं टाकताना समोर येऊ घातलंय एक नवं कोरं पानं!
त्या पानाचा करकरीतपणा, त्याचा सुगंध काहीतरी खुणावतोय मला!
मनात आत्ताच असंख्य शब्द घोळू लागलेत! मग वाट ती कशाची बघा?
उचलुया लेखणी आणि करूया पुन्हा एक नवीन श्री गणेशा...